Ad will apear here
Next
वनदेवी लक्ष्मीकुट्टी
लक्ष्मीकुट्टीकेरळच्या जंगलात राहणाऱ्या ७५ वर्षांच्या लक्ष्मीकुट्टी गेली ५० वर्षं रुग्णांवर औषधोपचार करत आहेत. वनौषधींबद्दलचं त्यांचं ज्ञान दांडगं आहे. सापाच्या विषावरील औषधही त्या बनवतात. ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांची ओळख करून घेऊ या.
...........
स्वतःचं विश्व स्वतःच निर्माण करून आयुष्यभर त्यातच रममाण होणारे काही जीव असतात. लक्ष्मीकुट्टीही त्यातल्याच एक. ७५ वर्षांच्या लक्ष्मीकुट्टी जंगलातल्या जीवसृष्टीचा एक भाग होऊन जगल्या आणि जगत आहेत. (जन्म : १९४३) मल्याळी भाषेत सांगायचं तर ‘वनमुथसी’ ही त्यांची खरी ओळख. (मराठीत वनदेवी किंवा अगदी शब्दशः म्हणाल तर जंगलमाता). 

केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यात असलेल्या ‘कल्लार’ या घनदाट जंगलात कानी जमातीचं वास्तव्य आहे. ही केरळमधली सगळ्यात मोठी आदिवासी जमात. लक्ष्मीकुट्टी त्यांच्यापैकीच एक. एखाद्या उच्चविद्याविभूषित शास्त्रज्ञाच्या तोडीस तोड ज्ञान आणि कार्य असूनही अगदी १९९५पर्यंत त्यांच्या वसाहतीच्या आजूबाजूच्या गावातल्या गावकऱ्यांव्यतिरिक्त फारसं कोणी त्यांना ओळखत नव्हतं. औषधोपचारांचा फायदा झालेल्यांकडून गोष्टी ऐकून लोकं उपचारासाठी त्यांच्याकडे येत असत; मात्र ९५ साली केरळ सरकारच्या निसर्गोपचार विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘नाटू वैद्य रत्नं’ या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आणि अख्खं केरळ राज्य त्यांना ओळखू लागलं. 

५०च्या दशकात जंगलापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाऊन शिकणाऱ्या मुलींमध्ये त्या एकमेव होत्या. त्यांच्या वडिलांचा या शिक्षणाला विरोधच होता; पण लक्ष्मीकुट्टींनी आपला धोशा चालूच ठेवल्यानं अखेर वडिलांना माघार घ्यावी लागली आणि त्यांचे शिक्षण सुरू झाले. शाळेच्या मर्यादेमुळे त्यांना आठवीपर्यंतच शिक्षण मिळालं. त्याच कालावधीत त्यांन संस्कृतवरही प्रभत्व मिळवलं. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी लग्न केलं आणि ताडामाडांच्या झावळ्यांचं छप्पर असलेल्या झोपडीत आपला संसार थाटला. त्यांचं सगळं अस्तित्व अजूनही त्याच वास्तूभोवती टिकून आहे. 

जंगलात सापडणाऱ्या विविध औषधी वनस्पती आणि झाडपाला वापरून लक्ष्मीकुट्टींनी ५०० प्रकारच्या विविध आजारांवर औषधोपचार शोधून काढले आहेत. त्यांना हे ज्ञान ‘आया’ म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या आईकडून मिळालं, असं त्या सांगतात. जंगलातल्या वास्तव्यात ज्याची गरज खूप वेळा भासते, त्या ‘सापाच्या विषावरचं औषध बनवणाऱ्या’ ही त्यांची खास ओळख आहे. इतरही अनेक आजारांवर त्यांच्याकडे रामबाण इलाज आहे. आश्चर्य म्हणजे या सगळ्या औषधोपचारांची आणि ती औषधं तयार करण्याच्या कृतीची कुठलीही कागदोपत्री नोंद त्यांनी किंवा त्यांच्या आईनं केलेली नाही. उत्तम स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांचं हे काम गेली पन्नास वर्षं अव्याहत चालू आहे. 

असं असूनही अनेक रुग्ण मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि वेळेवर औषधोपचार न मिळाल्यानं आपल्या जिवाला मुकतात. कारण १९५२ साली मुख्य गावापासून जंगलातल्या वस्तीपर्यंत सरकारी कागदपत्रांवर संमत झालेल्या पक्क्या रस्त्याचं काम अजून सुरूच झालेलं नाही. खुद्द लक्ष्मीकुट्टींचा एक मुलगा जंगली हत्तीच्या हल्ल्यात जखमी झाला आणि उपचारासाठी वेळेवर गावात पोहोचू न शकल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्यांचा दुसरा मुलगाही असाच एका अपघातात गेला. ‘आयुष्यानं अनेक अडचणी आणि दुःखं दिली; पण नवऱ्यानं मात्र अगदी लग्न झाल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत प्रोत्साहन आणि भक्कम साथ दिली,’ असं त्या आवर्जून सांगतात. 

अव्याहत चालणाऱ्या या औषधोपचारांच्या यज्ञाबरोबरच आवश्यक त्या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आपल्या घराभोवती लावून वाढवण्याचं कामही त्या स्वतः करतात. जोडीला एका संस्थेत निसर्गोपचाराच्या शिक्षिका म्हणूनही काम करतात. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी दौरे काढून निसर्गोपचारावर चर्चासत्रं आणि व्याख्यानासाठी जातात. भरपूर लिखाणही करतात. आपल्या खुसखुशीत विनोदी शैलीत त्यांनी अनेक नाटकं, कविता आणि ललित लेख लिहिले आहेत. 

उशिराने का होईना, केरळच्या वन विभागानं लक्ष्मीकुट्टींच्या निसर्गोपचार पद्धतींच्या नोंदी घेऊन त्याचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात लक्ष्मीकुट्टींचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला होता. तसंच २०१८चा पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारनं त्यांच्या कार्याचाही योग्य गौरव केला आहे. आता आयुष्याच्या शेवटी, दीर्घ उपचारांसाठी आलेल्या रुग्णांची योग्य सोय करता यावी म्हणून आपल्या झोपडीच्या जागी छोटं हॉस्पिटल उभं राहावं, ही एकच त्यांची इच्छा आहे. 

त्यांच्या या कार्याला भरपूर शुभेच्छा!

- आरती आवटी
ई-मेल : aratiawati@gmail.com

(‘नवरत्ने’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZPQBT
Similar Posts
कर्तृत्ववान महाराणी गायत्रीदेवी अत्यंत सुंदर, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम कर्तृत्व यांचा मिलाफ महाराणी गायत्रीदेवींच्या व्यक्तिमत्त्वात होता. वेगवेगळ्या प्रकारच्या चारचाकी गाड्या चालवण्यापासून पोलो खेळापर्यंत आणि शिकारीपासून घोडेस्वारीपर्यंत असे त्यांचे वैविध्यपूर्ण छंद होते. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर महाराणी हे बिरुद मिरवून
लेखणीची शक्ती दाखविणाऱ्या काशीबाई पूर्वी विविध प्रकारच्या बंधनांमुळे केवळ ‘चूल आणि मूल’ यांतच अडकून पडावे लागलेल्या स्त्रियांनी आज आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रौत्सव आजपासून सुरू होतो आहे. ते औचित्य साधून आम्ही घेऊन येत आहोत ‘नवरत्न’ नावाची लेखमालिका. पूर्वीच्या काळी अनेक बंधने
पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे पतिनिधनानंतर ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र बंद पडू न देता ते स्वतः अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवून तानुबाई बिर्जे यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांचं कर्तृत्व सिद्ध केलं. ‘नवरत्ने’ मालिकेत आज माहिती घेऊ या पहिल्या स्त्री संपादक तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल...
बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कमलादेवी चट्टोपाध्याय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सहभाग, पारंपरिक कलांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न, लेखन, सामाजिक कार्य या आणि अशा विविध क्षेत्रांत कार्य केलेलं बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे कमलादेवी चट्टोपाध्याय. ‘नवरत्ने’ मालिकेत आज त्यांच्याबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language